
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पस येथे ५ जुलै रोजी ‘इनोव्हेशन महाकुंभ’, महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण व वर्धापन दिन सोहळा
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘इनोव्हेशन महाकुंभ’, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा, नागरी हवाई वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार राज्यसभा डॉ . मेधा कुलकर्णी, एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र. कुलगुरू प्रा. रुबी ओझा, कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून याशिवाय शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील मान्यवर, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समाजसुधारणेसाठी केलेल्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच ‘इनोव्हेशन महाकुंभ’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर यांनी केले आहे.



