
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम व अखंडित करण्याच्या उद्देशाने मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि महावितरण भोसरी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, सुरेश गवस आणि निस्सार सुतार उपस्थित होते.
महावितरणच्या वतीने भोसरी कार्यालयाचे नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी अभियंता लहाने, आकुर्डी विभागाचे सहाय्यक अभियंता शिर्के, मोशी विभागाचे सहाय्यक अभियंता मोरे, तळवडे विभागाचे उपविभागीय अभियंता सरोदे, अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड तसेच विभागीय अभियंते झोपे आणि हुलसुळकर उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या अभियंत्यांचा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीचे संचालन अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी केले. त्यांनी मागील महिन्यात फीडरनिहाय वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांचा आढावा घेतला. योग्य नियोजन, देखभाल आणि तांत्रिक उपाययोजनांमुळे बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तळवडे विभागात अद्यापही तुलनेने अधिक प्रमाणात वीजपुरवठा खंडित होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
बैठकीत विशेषतः तळवडे परिसरातील देवी इंद्रायणी फीडरवर वारंवार उद्भवणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर सखोल चर्चा झाली. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून औद्योगिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी उपविभागीय अभियंता सरोदे यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
उद्योगांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही औद्योगिक विकासासाठी अत्यावश्यक बाब असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही महावितरण आणि लघुउद्योग संघटना यांच्यात नियमित समन्वय बैठका घेऊन उद्योगांच्या वीजविषयक अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



