
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ मधील नेवाळे वस्ती परिसरात बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल शेजारी करण्यात आलेल्या स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामात गंभीर त्रुटी आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी चेंबर तुटलेल्या अवस्थेत उघडे पडले असून, केवळ प्लास्टिक बॅरिकेड लावून प्रशासनाने जबाबदारी झटकली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा होत असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, माजी नगरसेवक संजय नेवाळे व मारुती जाधव यांनी पावसाळ्यापूर्वीच स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन वेळेत उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या चेंबर तुटलेले, काँक्रीटचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले आणि निकृष्ट दर्जाची कामे नागरिकांच्या सुरक्षेशी थेट खेळ करत असल्याचे चित्र आहे. एखादा दुचाकीस्वार किंवा शाळकरी विद्यार्थी या उघड्या चेंबरमध्ये पडून गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मारुती जाधव यांनी सांगितले की, “प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आमचा उद्देश राजकारण नाही, तर नागरिकांचे प्राण वाचवणे आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन निकृष्ट कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या एखादा निष्पाप जीव गेला, तर त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेवरच असेल.



