
शिष्टमंडळात चर्चेस न बोलावल्याने आंदोलक घुसले महापालिका कार्यालयात
उद्या आयुक्त यांच्यासोबत होणार बैठक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून १० हजार घरांची निर्मिती करावी, किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा मिळावा, महानगरपालिकेच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर टाकू नये आणि प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी येथे भव्य घर हक्क मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने लाभार्थी, कामगार आणि नागरिक सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२० मध्ये रावेत येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी अर्ज मागविले होते. त्यावेळी अनेक कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक पात्र ठरले. त्यावेळी घराची किंमत ६ लाख ९५ हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, महानगरपालिकेच्या अक्षम्य नियोजन शून्यतेमुळे संबंधित जागेचा ताबा घेणे आणि बांधकाम करणे शक्य झाले नाही. त्यानंतर लाभार्थ्यांना किवळे येथील गृहप्रकल्पात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकल्पातील घरांची किंमत वाढून १३ लाख रुपये करण्यात आली. आर्थिक अडचणी असूनही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी ही वाढीव किंमत स्वीकारली.
काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, किवळे गृहप्रकल्पाची सोडत १५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. उलट अनेक लाभार्थी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बँकेचे कर्जाचे हप्ते भरत आहेत. घराचा ताबा नसताना आर्थिक ओझे वाढत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वेगवेगळ्या कागदपत्रांची, मंजुरीची आणि प्रशासकीय प्रक्रियेची कारणे पुढे करून ताबा देण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप करत ही ‘आवास योजना आहे… की भास योजना ?’ अशी टीकाही त्यांनी केली.
नखाते पुढे म्हणाले की, महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे घराचे स्वप्न रखडले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुतळ्यापासून ते महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले मात्र महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिका प्रशासनाने शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी टाळाटाळ केली असता आंदोलकांनी महानगरपालिकेचे गेट काढून घोषणा देत आतमध्ये घुसून पायऱ्या वरती आंदोलन आणि घोषणा सुरू केल्यानंतर प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व अण्णा बोदडे यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा केली. यात महासंघाने महानगरपालिकेने तात्काळ किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना घरांचा ताबा द्यावा, १० हजार घरांची निर्मिती करावी, मुद्रांक शुल्क माफ करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, गृहप्रकल्पातील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे तसेच महानगरपालिकेच्या चुकीमुळे ताबा मिळण्यास झालेल्या विलंबाचा आर्थिक भार लाभार्थ्यांवर न टाकता ताबा मिळेपर्यंतचे बँक कर्जाचे हप्ते महानगरपालिकेने भरावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावर जंगम यांनी मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी प्रक्रिया सकारात्मक सुरू असून उद्या आयुक्त सूर्यवंशी यांच्याशी बैठक घेऊन ताबा देण्याबाबत व मुद्रांक शुल्क माफी बाबत अंतिम निर्णय करू असे आश्वासन दिले.
यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी चेतन गायकवाड, राजेश माने, कान्हाभाऊ व्हरकटे, अमृत पाटील, सखाराम केदार, शुभांगी चव्हाण, आशा जाधव, शुभांगी चव्हाण, भागवत नागपुरे, अंगद मुंगळे, प्रीती गोहाड, विकी भाट, जितेंद्र महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
















