
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी पुन्हा केले आहे.
शहरातील उपलब्ध जलस्रोतांवर वाढता ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर करून जलतरण तलाव भरण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहन धुण्यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पाणी बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच घरगुती पातळीवर पाण्याची गळती रोखणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. हाऊसिंग सोसायट्या व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
चार दिवस उलटूनही एकाही व्यक्तीवर कारवाई नाही
पाटबंधारे विभागाने शुक्रवार (दि. १९) पासून १५ टक्के पाणीकपात सुरू केली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवार (दि. २०) पासून शहरात 15 टक्के पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठ्यात अर्धा ते एक तास कमी करण्यात आले आहे. त्यावेळेस आयुक्तांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तो निर्णय जाहीर करून चार दिवस उलटले तरी, अद्याप एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यासाठी अद्याप पथकेच नेमण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



