भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत ‘सिंधी प्रीमिअर लीग’ पाचव्या पर्वाचे शानदार उद्घाटन
– तीन संस्थांना दहा लाखाची मदत; एएनपी कर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या पाचव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे. यंदा सिंधी प्रीमियर लीगच्या वतीने एएनपी केअर फाऊंडेशनला साडेसात लाखाचे डायलिसिस मशीन, सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनला दीड लाख, तर जागृती स्कुल फॉर ब्लाईंड गर्ल्स संस्थेला ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
येत्या २ मार्चपर्यंत होणार असलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. यावेळी एएनपी केअर फाऊंडेशनचे जवाहर कोटवानी, अशोक वासवानी, उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, अनिल आसवानी, उद्योजक गणेश कुदळे, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी आदी उपस्थित होते.
केदार जाधव म्हणाला, “क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे. मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवेत. यंदापासून महिलांनाही खेळण्याची संधी दिली असून, सिंधी समाजाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने वातावरणात ऊर्जा संचारत आहे. समाजातील तरुणांमध्ये खेळभावना रुजवण्यासाठी ही लीग महत्वाची आहे. संघभावना आणि प्रामाणिकपणे या खेळाचा आनंद घ्यावा.” भावेश भटिजा यांनी सूत्रसंचालन केले.
उद्घाटनाचा सामना मोहेंजोदारो वॉरियर्स आणि मस्त कलंदर यांच्यात रंगला. मस्त कलंदरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या मोहेंजोदारो वॉरियर्सने ८.५ षटकांत ८ गडी गमावत ३८ धावा केल्या. जतीन सेवानीने सर्वाधिक १२ धावा (२३ चेंडू) केल्या. इतर फलंदाजांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. मस्त कलंदरच्या रोहित मुलचंदानीने १२ धावांत २, निकेश छत्रानीने १० धावांत २ गडी, तर अंकुश मुलचंदानीने आठ धावा देत एक गडी बाद केला. विजयासाठी ३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानांत उतरलेल्या मस्त कलंदरची सुरवात अडखळत झाली. मात्र, गोलंदाजीपाठोपाठ रोहित मुलचंदानीने फलंदाजीतही धडाकेबाज कामगिरी करत दोन षटकारांसह आठ चेंडूत १६ धावा केल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मस्त कलंदरने अवघ्या ४.३ षटकांत विजय मिळवला. रोहितला सामनावीराचा किताब देण्यात आला.
या स्पर्धेत पुरुष गटात एकूण १६, तर महिला गटात एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत. पुरुष गटाच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी, तर महिला संघांचे नाव नद्यांशी निगडित आहे. पुरुषांच्या संघात मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स व पिंपरी योद्धाज अशी, तर महिला संघात गंगा वॉरियर्स, कावेरी क्रुसेडर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स आणि यमुना स्ट्रायकर्स यांचा समावेश आहे.
———————–
संक्षिप्त धावफलक :
मोहेंजोदारो वॉरियर्स – (८.५ षटकांत) ८ बाद ३८ (जतीन सेवानी १२, रोहित मुलचंदानी २-१२, निकेश छत्रानी २-१०) पराभूत विरुद्ध मस्त कलंदर – (४.३ षटकांत) ३ बाद ४१ (रोहित मुलचंदानी १६, अंकुश मुलचंदानी ९, परम नानकानी २-१८)