
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताकेंद्रांवर भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महापौरपदासाठी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षांकडून कोणताही प्रभावी उमेदवार न आल्याने ही निवड प्रक्रिया निर्विघ्न पार पडली.
महापालिकेच्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी दोन्ही पदांवरील निवडींची अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पक्षाकडून स्पर्धात्मक अर्ज सादर न झाल्याने भाजपच्या उमेदवारांचा विजय आधीच निश्चित झाला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पत्र पाठवून उमेदवारांच्या नावांबाबत पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार सोमवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या महापौर निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने ही निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.
महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही महत्त्वाची पदे भाजपकडे गेल्यामुळे येत्या काळात शहराच्या प्रशासकीय व विकासात्मक निर्णयांवर भाजपचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येणार आहे.
















