पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस आक्रमक; काळेवाडीत सरकारविरोधात जोरदार निदर्शने
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘महिला आरक्षण विधेयक २०२३’ मंजूर होऊनही केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) काळेवाडी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. “महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजप स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून, हा महिलांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दांत शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी सरकारवर प्रहार केला.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा आणि प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळेवाडी येथे पार पडले. यावेळी मनोज कांबळे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,ॲड. किरण खाजेकर सेवादल अध्यक्ष, नरेंद्र बनसोडे, विठ्ठल शिंदे, पांडुरंग जगताप,ॲड.राजेंद्र काळभोर, भास्कर नारखेडे,स्वाती शिंदे,ॲड. प्रियंका ढगे,आशा भोसले,प्रियांका सगट,शबाना शेख, हरीश डोळस,विजय ओव्हाळ काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली.
भाजपची नवी ‘खेळी’; सायली नढे यांची टीका
आंदोलनाचे नेतृत्व करताना सायली नढे म्हणाल्या की, “केंद्र सरकारने २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले, पण आज २०२६ उजाडले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याऐवजी २०२६ मध्ये पुन्हा परिसीमनाचा (डिलिमिटेशन) मुद्दा पुढे करून हे आरक्षण लांबणीवर टाकले जात आहे. ही केवळ महिला आरक्षणाची फसवणूक नसून देशाच्या लोकशाही रचनेत बदल करण्याचा आणि संविधानावर आक्रमण करण्याचा प्रकार आहे.”
त्यापुढे म्हणाल्या की, “वास्तविक पाहता पहिल्यांदा जातिनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, मात्र भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसने नेहमीच महिलांना सत्तेत आणि पक्ष संघटनेत प्राधान्य दिले आहे. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची परंपरा काँग्रेसला लाभली आहे. जर सरकारने तातडीने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आणखी तीव्र संघर्ष करेल.”

