पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (मनपा) आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तब्बल ५० ते ५२ कोटी रुपयांच्या बिल वितरणावरून लेखा विभागावर गंभीर आरोप होत आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांना देयके अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
माहितीनुसार, सन २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पात संबंधित कामांसाठी कोणतीही तरतूद नसताना तब्बल ७० हून अधिक कामांची बिले काढण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेबाबत संबंधित विभागप्रमुखांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे समोर आले आहे. बोगस उपसूचना तयार करून आणि काही नगरसेवकांच्या कथित स्वाक्षऱ्यांचा आधार घेत हा व्यवहार झाल्याचीही गंभीर बाब समोर येत आहे.
या प्रकरणावर स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “हा प्रकार म्हणजे मनपाच्या तिजोरीवर टाकलेला सरळसरळ दरोडा आहे,” अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणावर बोलावण्यात आलेल्या बैठकीला मुख्य लेखा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संशय अधिकच बळावला आहे. प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत असून, आयुक्तांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
या घडामोडींमुळे मनपाच्या आर्थिक कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

