अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात (दि. १ एप्रिल २०२५ ते २९ मार्च २०२६) मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अगदी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून थकबाकीदारांना लवकरात लवकर मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
मालमत्ता कर विभागाचे नियोजनबद्ध व लक्ष्यवेधी कामकाज, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सेवांमुळे मालमत्ता कर वसुली ९०० कोटीपेक्षा जास्त झाली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
याशिवाय महापालिकेमार्फत थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने ही योजना नागरिकांसाठी शेवटची सुवर्णसंधी ठरत आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ८६ हजार ८७६ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तसेच , ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांविरोधात कर संकलन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांची जप्ती करण्याची कारवाई सुरू असून, निवासी मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीमही राबविण्यात येत आहे. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागातून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत सध्या विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना कर भरण्यास आवाहन करत आहेत..
वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली
कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते २९ मार्च २०२६ या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने ११० कोटी ४२ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर थेरगाव ९२ कोटी ४८ लाख, चिखली कार्यालयाने ७९ कोटी ५६ लाख, किवळे ६२ कोटी ५८ लाख, भोसरी ६० कोटी ३० लाख, , मोशी ५९ कोटी १० लाख, चिंचवड ५६ कोटी ८२लाख
कस्पटे वस्ती ५६ कोटी, पिंपरी वाघेरे ४९ कोटी १४, सांगवी ४५ कोटी ६ लाख, मनपा भवन ४० कोटी १० लाख, आकुर्डी ३९ कोटी २ लाख, चऱ्होली ३६ कोटी ४६ लाख, , फुगेवाडी दापोडी ३४ कोटी ४८ लाख, दिघी बोपखेल २६ कोटी ४१ लाख, तळवडे २५ कोटी ३ लाख,निगडी प्राधिकरण २० कोटी १६ लाख, पिंपरी नगर ८ कोटी १२ लाख वसुली केली आहे.
पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेला सकारात्मक प्रतिसाद ही महापालिकेसाठी अभिमानाची बाब आहे. कर भरणे ही केवळ जबाबदारी नसून शहराच्या विकासात थेट योगदान देणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विविध सेवांच्या बळकटीसाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर मोठी सवलत दिली जात आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकीदार नागरिकांनी ही संधी साधून आपला थकीत मालमत्ता कर तात्काळ भरावा आणि शहराच्या सर्वांगीण विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
रवि लांडगे , महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका
मालमत्ता कर वसुली अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमांतून कर भरण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना सुलभता निर्माण झाली आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदारांना विलंब दंडावर मोठी सवलत देण्यात येत असून, ही योजना नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत वेळेत मालमत्ता कर भरावा.
डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त , पिंपरी चिंचवड महापालिका

