मुख्यमंत्री महोदयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रश्न मार्गी लागणार – आमदार अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत मांडला अधिवेशनातील कामकाजाचा लेखाजोखा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहराच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यात यश आले आहे. केवळ प्रश्न मांडले नाहीत, तर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून त्याबाबत सकारात्मक कृती आराखडा आणि निधीचे ठोस आश्वासनही मिळवले आहे, अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनानंतर आयोजित या विशेष पत्रकार परिषदेत आमदार गोरखे यांनी शहराच्या विकासासाठी उचललेल्या पावलांचा सविस्तर आढावा घेतला. शहराच्या विस्तारित भागातील रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवण्यावर भर दिला असून, प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न (बापू) काटे, उपमहापौर सौ.शर्मिला बाबर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष श्री.संजय (नाना) काटे, ज्येष्ठ नेते श्री.सदाशिव खाडे, श्री.राजू दुर्गे, नगरसेवक श्री.तुषार हिंगे, श्री.शितल उर्फ विजय शिंदे, श्री.कुशाग्र कदम,श्री .अमित गावडे, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, सौ.सुप्रिया चांदगुडे, सौ.मधुरा शिंदे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख श्री.राजेश पिल्ले, भाजपा मंडल अध्यक्ष श्री.धरम वाघमारे, भाजपा मंडल अध्यक्षा सौ.अनिता वाळूजकर, भाजपा चिटणीस श्री.नरेश पंजाबी, श्री. राजेंद्र बाबर, श्री.युवराज लांडे,श्री.देवदत्त लांडे, श्री.नंदू कदम, श्री.नेताजी शिंदे, श्री.सुनील पलांडे,श्री.सुनील कदम उपस्थित होते .
मुख्यमंत्र्यांची विशेष दाद
सभागृहात पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी वैयक्तिकरीत्या कौतुक केले. एका लोकप्रतिनिधीसाठी आपल्या नेत्याकडून मिळालेली ही शाबासकी म्हणजे शहराच्या सेवेसाठी मिळालेली नवी ऊर्जा आहे. पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. येत्या काळात रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावून, शहराचा समतोल विकास साधणे हेच आमचे प्राथमिक ध्येय आहे, असेही आमदार गोरखे यांनी यावेळी नमूद केले.
शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर केवळ चर्चा न करता, ते तडीस नेण्यासाठी मी विधानपरिषदेत आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाची गंगा घराघरांत पोहोचवू. – अमित गोरखे, आमदार

