चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत एक दिवशीय कराटे प्रात्यक्षिक व महिला हक्क व संरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने कराटेचे प्रात्यक्षिके व प्रशिक्षण तसेच महिला हक्क संरक्षण विषयक कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे व दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून देणे हा होता.
कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा व सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम , कराटे प्रशिक्षक सतीश राजहंस , सारिका राजहंस, शिवानी राजहंस, अँड. शुभा पिल्ले, विद्यार्थी विकास अधिकारी अँड. प्रा. गीता कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
त्यांच्या सत्कार प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या हस्ते करण्यात आला .या कराटे प्रशिक्षक सतीश राजहंस, सरिका राजहंस, तसेच शिवानी राजहंस यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सतर्क व सज्ज राहणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षकांनी स्वसंरक्षणाचे विविध पैलू सविस्तरपणे स्पष्ट केले. आत्मविश्वास वाढविणे, परिस्थितीचे योग्य आकलन करणे आणि तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे यासाठी स्वसंरक्षण अत्यंत उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले. तसेच विविध प्रत्यक्ष तंत्रे आणि उपाययोजना विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या.
विद्यार्थ्यांनी या सत्रात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी प्रत्यक्ष सराव करून स्वसंरक्षणाच्या मूलभूत हालचाली व धोकादायक परिस्थितीतून कसे बाहेर पडावे हे शिकले. कार्यशाळा कार्यक्रम अत्यंत संवादात्मक, माहितीपूर्ण आणि आकर्षक ठरला. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक तसेच मानसिक तयारीचे महत्त्वही समजले.
एकूणच, हा स्वसंरक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली. महिला हक्क व संरक्षण विषयक व्याख्यात्या अँड. डॉ . शुभा पिल्ले यांनी सखोल मार्गदर्शन करून विद्याथ्र्याच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे दिली .
विद्यार्थी विकास अधिकारी अँड. प्रा. गीता कांबळे यांनी प्रस्तावना व आभार मानले .

