मानवी जीवनातच ईश्वरप्राप्ती शक्य आहे – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज
किवळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मानवी जीवनात भगवंताचा साक्षात्कार केल्याने जीवात्म्याचे भगवंताशी एकरूप होणे शक्य आहे.जेव्हा भक्ताची अशी अवस्था होते, तेव्हा त्याला सर्वत्र फक्त हा भगवंतच दिसतो आणि सर्वांप्रती एकत्वाची भावना त्याच्या हृदयात राहते. जेव्हा एखादा भक्त असे उदात्त जीवन जगतो तेव्हा तो इतरांसाठीही प्रेरणास्रोत बनतो.” असे उद्गार निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७ फेब्रुवारी २०२४, बुधवारी सायंकाळी मुकाई चौक, रावेत-किवळे, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित केलेल्या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमात उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.या पवित्र संत मेळाव्यात सर्व निरंकारी भक्तांनी व पुणेकरांनी सदगुरूंच्या दिव्य दर्शनाने व अनमोल वचनांनी सत्संगाचा मनसोक्त आनंद लुटला.
जीवनातील भक्तीचे महत्त्व समजावून सांगताना माताजींनी सांगितले की खरी भक्ती भगवंताचा साक्षात्कार झाल्यावरच सुरू होते. या निराकार परमात्म्याशी नाते जोडूनच जीवनात सुख-शांती मिळू शकते, हे संतांनी आपल्या पवित्र वाणीतून नेहमी समजावण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर जीवनाच्या कल्याणासाठीही भगवंताचे स्मरण केले पाहिजे कारण या इच्छा कधीच संपत नाहीत. एक पूर्ण झाल्यावर दुसरी आपोआप निर्माण होते, त्यामुळे त्याचा प्रभाव टाळून आपण सर्वांनी महान भक्ताचे जीवन जगावे.
सदगुरु माताजी पुढे स्पष्ट करतात की मन स्थिर करून आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहून, असे जीवन जगले पाहिजे की ते खरोखर कृतज्ञतेच्या भावनेने भरलेले असेल. देवाने जे काही दिले आहे त्यात आनंदी राहून, त्याच्याप्रती निष्काळजी न राहता, आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडून प्रत्येक गोष्टीचा सदुपयोग करून जीवनात केवळ भगवंतालाच प्राधान्य दिले पाहिजे. या कार्यक्रमात मिशनच्या वक्त्यांनी गीत, विचार, कविता आदि माध्यमातून आध्यात्मिकता व मनुष्य जीवनाच्या सार्थकतेबाबत आपले भाव व्यक्त केले ज्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला.
संत निरंकारी मंडळाच्या पुणे झोनचे प्रभारी श्री.ताराचंद करमचंदानी यांनी सदगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे समस्त भक्तगणांच्या वतीने आभार व्यक्त केले.