पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २० मधील संत तुकारामनगर परिसरात वाढलेल्या टपरीमाफिया व अतिक्रमणाच्या समस्येविरोधात नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. परिस्थिती सुधारली नाही तर संत तुकारामनगरचे नाव ‘टपरीनगर’ करण्याची उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे.
नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी सांगितले की, महानगरपालिकेवर प्रशासक असताना या भागात टपरीधारकांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. संत तुकारामनगर, मेट्रो स्टेशन परिसर, वल्लभनगर एसटी स्थानक, वाय.सी.एम. रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच मंडई परिसरात टपरीमाफियांनी पदपथांवर अतिक्रमण करून फेरीवाल्यांना जागा भाड्याने देत बेकायदेशीर वसुली सुरू केली आहे.
या टपरीधारकांकडून ग्राहकांची वाहने रस्त्यावर अनियंत्रितपणे पार्क केली जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः वाय.सी.एम. व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील भागात रुग्णवाहिका अडकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच सांडपाणी, कचरा व अस्वच्छतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांना दमदाटी व दबाव टाकण्याचे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. प्रशासन कारवाईसाठी आले असता टपरीधारकांकडून राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तात्काळ हस्तक्षेप करून अनधिकृत टपऱ्यांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक अडथळे दूर करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ननावरे यांनी केली आहे. अन्यथा संत तुकारामनगरचे ‘टपरीनगर’ असे नामकरण करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

