पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या ‘सखी आंगण’ या महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या उपक्रमाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन आणि सहभागी महिला बचत गटांचे विशेष कौतुक करत आमदार अमित गोरखे यांना शुभेच्छा पत्र पाठवले आहे. हे सन्माननीय पत्र आमदार गोरखे यांनी आज नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी आमदार अमित गोरखे यांनी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. या भेटीदरम्यान शहरातील नवीन विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक शिस्त आणि कायदा व सुव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महिला सक्षमीकरणाचा ‘आकुर्डी पॅटर्न’
आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ४९ गाळ्यांचे वाटप महिला बचत गटांना करण्यात आले आहे. या केंद्रात खाद्यपदार्थ, हस्तकला आणि घरगुती वस्तूंच्या विक्रीसाठी सुसज्ज व सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
व्यवसायाची थेट संधी
या उपक्रमावर भाष्य करताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, ई-लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटप करून त्यांना सुसज्ज, सुरक्षित व सन्मानजनक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना खाद्यपदार्थ, हस्तकला आणि घरगुती वस्तूंच्या व्यवसायाची थेट संधी मिळाल्याने त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्राचे सुशोभीकरण आणि प्रसिद्धी करताना डिझायनिंग व मार्केटिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच, ‘सखी आंगण’मधील भिंतींवर साकारण्यात आलेले महाराष्ट्रातील थोर महिलांचे कार्य आणि विदर्भातील पारंपरिक ‘गोंडी चित्रकले’चे दर्शन यामुळे हा प्रकल्प व्यावसायिकतेसोबतच सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध झाला आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी ‘सखी आंगण’ उपक्रमाचे कौतुक करणे, ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. हा प्रकल्प केवळ व्यावसायिक नसून महिलांच्या कौशल्य विकासाचे आणि आत्मविश्वासाचे केंद्र बनला आहे. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विकासाच्या प्रगतीपथावर असेल, असा आम्हाला विश्वास आहे. – अमित गोरखे, आमदार
‘सखी आंगण’ हा उपक्रम राज्यातील इतर महानगरपालिकांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

