पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे सविस्तर तक्रार सादर करत या प्रकल्पातील निविदा प्रक्रिया आणि खर्चाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप केले आहेत.
भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली जागा आणि त्यानंतर करण्यात आलेले बदल यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात करण्यात आलेल्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून, नियोजनातील त्रुटींमुळे पुन्हा बदल करावे लागल्याने आर्थिक नुकसान वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, पुतळा उभारणीसारख्या विशेष कामासाठी आवश्यक असलेली तांत्रिक पात्रता आणि अनुभव असलेल्या संस्थांची निवड न करता, नियमांचे उल्लंघन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘CVC Guidelines’ आणि ‘Maharashtra Purchase Policy’ चे उल्लंघन झाल्याचा उल्लेखही या तक्रारीत आहे.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खर्चात मोठी वाढ करण्यात आल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेत स्पर्धात्मकता राखली गेली नाही, तसेच अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च मंजूर करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, स्थापत्य आणि विद्युत कामांचे एकत्रीकरण करून निविदा काढण्यात आल्याने पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला असून, संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच अपव्यय झालेला निधी वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासारख्या भावनिक विषयावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने पारदर्शकता ठेवून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

