पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, तसेच ही सेवा सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत लंगोटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, मुंबई, अंबरनाथ आणि कोल्हापूर महापालिकांच्या हद्दीत मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च संबंधित महापालिका प्रशासनाकडून उचलला जातो. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही अशी योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड, गॅस तसेच दफनासाठी लागणारी जागा आणि खड्डा खोदण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. पिंपरी-चिंचवडमध्येही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई तसेच इतर सर्व समाज घटकांसाठी ही योजना लागू करावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात स्थायी समिती व महापालिका सभेत यापूर्वीच ठराव मंजूर झाले असून, आयुक्तांनीही आदेश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. मात्र अद्याप प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत लंगोटे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, इतर शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही नागरिकांकडून या योजनेची मागणी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ही योजना सुरू करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. ही योजना लागू झाल्यास शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक समतेच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

