
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने विरांगणा महिला महासंघाच्या पुढाकारातून विशेष महिला सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सुमारे ७५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या शिबिरात महिलांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती आणि सहाय्य देण्यात आले.
तसेच महिलांसाठी उपयुक्त असलेल्या ई-श्रम कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, मनरेगा योजना, बीओसीडब्ल्यू (BOCW) कामगार कार्ड, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना, आयुष्मान भारत कार्ड, यूडीआयडी कार्ड, उद्यम प्रमाणपत्र तसेच पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत व्हावी हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे विरांगणा महिला महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.
या शिबिराचा लाभ परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने घेतला असून पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विरांगणा महिला महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका विनोद नढे यांनी दिली. तसेच या उपक्रमासाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विरांगणा महिला महासंघाच्या अध्यक्षा प्रियांका नढे, सुवर्णा सोनवलर, पूनम नढे, रुपाली लगड, पूजा मोळे, अश्विनी नढे, ममता वाळके, गायत्री नढे, ज्योती काळे, आरती जाधव, दिपाली खांबेवलेकर, उज्ज्वला चौधरी, मिनल भेडे, विद्या त्रिभुवन, सविता मोळे व कमल मोरे यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
















