मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार दिमाखदार सोहळा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना तिसऱ्या “पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समाजजीवन, कला, साहित्य, पर्यावरण, क्रीडा, शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यंदा सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यंदाचे पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे : अथर्व अभय कुलकर्णी (कला व संगीत), अरुण पुराणिक (पर्यावरण संवर्धन), डॉ. राजेंद्र काकंरिया (साहित्य व शिक्षण), अनिल मित्तल (उद्योग व सामाजिक कार्य), संतोष खवळे (कृषी), कृष्णा ढोकले (गिर्यारोहण व साहसी क्रीडा), श्लोक ताम्हाणे (राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक), श्रीकांत चौगुले (निवेदन व लेखन), पांडुरंग वाघमारे (शैक्षणिक कार्य) तसेच प्रद्योत पेंढारकर (सांस्कृतिक व चित्रपट विषयक क्षेत्र).
या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस राहणार आहेत.
शहराला तब्बल सात वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधी लाभल्याच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी नवनियुक्त महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अण्णासाहेब बनसोडे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
🎬 विशेष सूचना : माध्यम प्रतिनिधींसाठी “सुलतान” लघुपटाचे खास स्क्रीनिंग
दरम्यान, “ पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६ ” सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त “सुलतान” या लघुपटाचे माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन अविनाश किसनराव कांबीकर यांनी केले असून, तो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित आहे. पत्रकार व चित्रपट समीक्षकांना या विशेष स्क्रीनिंगद्वारे कलाकृतीचा अनुभव घेण्याची तसेच दिग्दर्शकाशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हा सोहळा शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सायन्स पार्क, चिंचवड तारांगण सभागृह येथे पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन News14 Media Network चे संपादक अविनाश कांबीकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अविनाश कांबीकर- 9822696578

