पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मराठी साहित्य परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विधिवत ग्रंथपूजन करण्यात आले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे, या भावनेतून उपस्थितांनी मराठीच्या जतनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिसंगीत क्षेत्रातील प्रख्यात गायक पंडित राजाराम उर्फ राजा काळे यांनीही आपली भावना व्यक्त करत सांगितले की, “मराठी भाषा ही स्वर आणि शब्द यांचा दिव्य संगम आहे. संतसाहित्य, अभंग, भारुड आणि भक्तिगीते यांच्या माध्यमातून मराठीने संगीताला आत्मा दिला आहे. कुसुमाग्रजांसारख्या साहित्यिकांनी शब्दांना जे वैभव दिले, त्यातूनच मराठी संस्कृती अधिक समृद्ध झाली आहे. मराठी भाषा गौरव दिनासारख्या उपक्रमांमुळे भाषेप्रती प्रेम आणि अभिमान वृद्धिंगत होतो. अशा उपक्रमांतून नव्या पिढीला साहित्य आणि संस्कृतीची ओळख करून देणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.”
नगरसेवक आणि उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मराठी भाषा ही आपल्या विचारांची, संस्कारांची आणि सामाजिक जाणीवेची आधारभूत शक्ती आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्याने समाजाला दिशा दिली, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद दिली. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे. पुढील काळात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील.”
याप्रसंगी उद्योजक संदीप काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य परिवार, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संस्था यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

