– भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मानले पदाधिकारी-नगरसेवकांचे आभार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय व विकासाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात “अजितसृष्टी” उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी घोषणा केली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली होती. यावर महापौर आणि सभागृहातील पदाधिकारी- नगरसेवकांनी सर्वानुमते पाठिंबा दिला आणि प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबत आमदार लांडगे यांनी सभागृह आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
चिंचवड येथील डी-मार्टसमोरील सुमारे 33.86 एकर जागेत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जात असून, त्यापैकी 8.65 एकर जागेवर मुख्य इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. भविष्यात संपूर्ण महापालिकेचे प्रशासकीय कामकाज याच भव्य इमारतीतून चालणार आहे. याच परिसरात अजितदादांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“अजितसृष्टी”मध्ये शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासाचा इतिहास, औद्योगिक प्रगती, नागरी सुविधा विस्तार आणि भविष्यातील विकास आराखड्याची ‘फ्युचर प्रिंट’ साकारण्यात येणार आहे. तसेच अजितदादांचा ब्राँझमधील पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, जुन्या प्रशासकीय भवनातील सभागृहात त्यांचे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. नव्या इमारतीतील प्रमुख सभागृहाला देखील अजितदादांचे नाव देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
दरम्यान, महापौर रवि लांडगे यांनी सभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची संयुक्त पाहणी करण्यात यावी. यासोबतच त्या ठिकाणी “अजितसृष्टी” उभारण्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
“लोकनेते दिवंगत अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याबद्दल महापौर, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निर्णय पिंपरी-चिंचवडच्या विकासदृष्टीला आणि एकात्मतेला बळ देणारा ठरेल.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

