रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात युवा उद्यम अभियान संपन्न
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘गरज आणि संधी यांच्या समन्वयातून उत्तम उद्योजक घडतो!’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे (सोमवार, दिनांक ०९ फेब्रुवारी) व्यक्त केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या युवा उद्यम अभियान उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन ईटकर बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते; तसेच दे आसरा फाउंडेशनच्या मनीषा गोखले – तपस्वी, अमेरिकास्थित गर्जे मराठीचे संस्थापक आनंद गानू, महाराष्ट्र विभागप्रमुख माधव दाबके, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, हृषीकेश भिडे, प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. संगीता अहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, ओंकार वाघमारे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सचिन ईटकर पुढे म्हणाले की, ‘कर्मवीर भाऊराव पाटील हे एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उभारलेली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. १९९३ मध्ये इंटरनेटमुळे माध्यमक्रांती घडून आली. त्यामुळे उद्योजक होण्यासाठी आता मोठ्या कुटुंबात जन्माला येण्याची गरज राहिली नाही. आज आव्हाने खूप असली तरी संधीही प्रचंड आहेत. आज उद्योजक होण्यासाठी भांडवलापॆक्षाही तुमच्याकडे अभिनव संकल्पना हव्यात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही विचार बदलाल त्या दिवशी तुमचा नवा दिवस सुरू होईल. स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करताना असंख्य उद्योजक असलेला आपला देश एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला येईल!’ विविध संदर्भ आणि प्रेरणादायी दाखले उद्धृत करीत ईटकर यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मनीषा गोखले – तपस्वी यांनी, ‘उद्योजकता ही एक मानसिकता आहे. भारतात काम करण्याची खूप संधी आहे; पण नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे युवा पिढीने आरंभशूरता टाळून अफाट कष्ट घेण्याची तयारी दाखवली तर अर्थव्यवस्थेला अग्रस्थानी नेता येईल!’ असा विश्वास व्यक्त करीत लघुउद्योजक होण्याचा कानमंत्र दिला. आनंद गानू यांनी संपर्काचे जाळे, अद्ययावत माहिती, उद्यमशीलता ही उद्योजक होण्यातील अत्यावश्यक गुणवैशिष्ट्ये नमूद केलीत; तर माधव दाबके यांनी जोखीम घेणे हे उद्योजकतेतील प्रमुख लक्षण असल्याचे सोदाहरण सांगितले. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘विद्यार्थ्यांचे जीवन अन् कुटुंब उभे राहण्यासाठी युवा उद्यम अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल!’ असा विश्वास व्यक्त केला.
कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विजया पोकळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी आभार मानले.

