ओला, सुका, घातक व सॅनिटरी कचरा वेगळा देण्याचे महापालिकेचे आवाहन
चार प्रकारे कचरा विलगीकरणावर आरोग्य विभागाचा भर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने नागरिकांनी घरगुती कचरा चार प्रकारांत विलगीकरण करूनच कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही जनजागृती मोहीम वेगाने राबवली जात आहे. या मोहिमेत घराघरांत संपर्क, फलक, पत्रके, समाजमाध्यमांद्वारे संदेश, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. योग्य पद्धतीने विलगीकरण केल्यास कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे सुलभ होते, पुनर्वापराचे प्रमाण वाढते, लँडफिलवरील ताण कमी होतो आणि पर्यावरण संवर्धनास चालना मिळते. तसेच शहरातील दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग व प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी घरातील कचरा चार प्रकारांत वेगळा करून तो वेळेत महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा. कचरा इतरत्र न टाकता नियमानुसार संकलन वाहनालाच देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
कचऱ्याचे असे करा विलगीकरण :
ओला कचरा – उरलेले अन्नपदार्थ, भाजीपाल्याचे तुकडे, फळांच्या साली इत्यादी; यासाठी हिरव्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
सुका कचरा – कागद, प्लास्टिक, काच, धातूच्या वस्तू, यासाठी निळ्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
घरगुती घातक कचरा – बॅटऱ्या, ट्यूबलाईट/बल्ब, औषधांचे अवशेष, रसायनयुक्त वस्तू; यासाठी काळ्या रंगाच्या डब्याचा वापर करावा.
सॅनिटरी कचरा – सॅनिटरी पॅड, डायपर, वैद्यकीय वापरातील साहित्य; यासाठी लाल रंगाच्या डब्याचा वापर करावा.
शहर स्वच्छतेसाठी कचरा विलगीकरण ही अत्यंत मूलभूत गरज आहे. नागरिकांनी ओला–सुका कचरा एकत्र न देता चार विविध प्रकारांत विलगीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला देत प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे.
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




















