ताज्या घडामोडी

चौथ्यांदा निवडून आलेल्या प्रशांत शितोळेंकडे भाजप गटनेतेपदाची धुरा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात भारतीय जनता पार्टीने अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवत प्रशांत शितोळे यांच्याकडे गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रशांत शितोळे हे सभागृहातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशाने भाजपच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली असून, पक्षाने त्यांच्या अनुभवाचा योग्य सन्मान करत त्यांना गटनेतेपदाची धुरा दिली आहे.

यापूर्वी प्रशांत शितोळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष म्हणूनही काम करत संघटनात्मक पातळीवर प्रभावी नेतृत्व केले होते. त्यामुळे प्रशासन, अर्थसंकल्प आणि सभागृहातील कार्यपद्धतीचा त्यांना सखोल अनुभव आहे.
प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात ८४ नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली. या वेळी आमदार शंकर जगताप यांचीही उपस्थिती होती. ८४ नगरसेवकांचा गट नोंदणीकृत झाल्याने महापालिकेतील भाजपची संख्या व राजकीय प्रभाव स्पष्टपणे वाढला असून, आगामी काळातील निर्णयप्रक्रियेत भाजप निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपच्या या निर्णयामुळे महापालिकेतील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, विकासकामे, प्रशासनावर नियंत्रण आणि जनहिताचे मुद्दे अधिक ठामपणे मांडले जातील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे. अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर भाजप महापालिकेत अधिक आक्रमक आणि प्रभावी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button