
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १९९२ पासून दादांच्या सानिध्यात काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दादांच्या जाण्याने आम्ही घरचा माणूस गमावला असून संपूर्ण उद्योगजगत पोरके झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“आम्ही प्रश्न मांडायचो आणि उत्तर ते सोडवायचे—हे जणू ठरलेलेच गणित होते. कोणतीही अडचण असो, दादे थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावून जागेवर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायचे,” असे बेलसरे म्हणाले. उद्योगधंद्यांना बळकटी देण्यासाठी दादांनी सातत्याने पुढाकार घेतला. लघुउद्योजकांचे प्रश्न, अडचणी आणि मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांनी उद्योजकांना मोठा आधार दिला.
कुदळवाडी येथील प्रश्नावर नुकतीच दादांसोबत भेट झाल्याचे सांगताना बेलसरे भावुक झाले. “समित्यांच्या निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढू, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने ती भेटच शेवटची ठरली,” असे ते म्हणाले.
दादांच्या निधनाने उद्योजकांसाठी झटणारा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आधारवड हरपला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे, अशा भावना पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.
















