ताज्या घडामोडीपिंपरी
खरा इतिहास सांगणारे पुस्तक “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” – डॉ. ओमेंद्र रत्नू


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराणा प्रताप यांचा खरा इतिहास जगापुढे आणण्यासाठी मी “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” हे पुस्तक लिहिले आहे. महाराणा प्रताप हे हलदी घाटीचे युद्ध हरले, हा चुकीचा इतिहास आहे. महाराणा प्रताप यांनी ५६ लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या, जगात चीन नंतर सर्वात जास्त लांबीची भिंत आणि संगीत कलेवर पहिले पुस्तक लिहिले. आता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांनी दुरुस्ती करावी आणि खरा इतिहास लिहावा असे आवाहन “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले.



लेखक डॉ. ओमेंद्र रत्नु यांनी लिहिलेल्या आणि चारूचंद्र उपासनी यांनी मराठी अनुवाद केलेल्या या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.३) आर्य समाज पिंपरी कॅम्प येथे झाला. यावेळी आर्य समाज पिंपरी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपाचे शहर अध्यक्ष शंकर जगताप, शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे, प्रकाशक अंकुर काळे, मराठी अनुवादक चारूचंद्र उपासनी, आर्य समाज पिंपरीचे संजय वासवानी, मुरलीधर सुंदरानी आणि हरेश तिलोकचंदानी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे पंडित धर्मवीर आर्य, सचिव उत्तम दंडीमे आदी उपस्थित होते. प्रकाशनापूर्वी मान्यवरांनी हवन केले.
डॉ. ओमेंद्र रत्नू म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रथम कुटुंबात एकोपा असला पाहिजे.
चारूचंद्र उपासनी यांनी सांगितले की, सत्य इतिहास सांगणारे हे दुर्मिळ पुस्तक आहे. महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते. सर्व देशवासीयांनी हे पुस्तक वाचून खरा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे. तरच वैचारिक आक्रमण रोखता येईल.
हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले की, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास शालेय अभ्यासक्रमात शिकविला जावा तसेच या महान व्यक्तींच्या आत्मचरित्रांचे घरोघरी पारायण झाले पाहिजे.
कार्यक्रमाच्या आयोजनात उत्तम दंडीमे, सुहास पोफळे, अतुल आचार्य, दिगंबर रिद्धीवाडे आदींनी परिश्रम घेतले.
स्वागत सुरेंद्र करमचंदानी, प्रस्तावना दत्ता सूर्यवंशी, सूत्र संचालन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.








