पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत राजकीय हालचालींना वेग आला असून, पिंपरी शहरातून युवकांचा एक ठाम सूर पुढे येत आहे. पिंपरी–चिंचवडमधील युवकांना यंदा तुषारभाऊ हिंगे हेच महापौर हवेत, अशी मागणी भाजपयुमो शहर उपाध्यक्ष अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा अडचणीत सापडली, किंवा पक्षासाठी कठीण निर्णय घेण्याची वेळ आली, त्या प्रत्येक टप्प्यावर तुषारभाऊ हिंगे यांनी स्वतःचा त्याग करत पक्षहिताला प्राधान्य दिले आहे. उपमहापौरपद असो वा भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी, तुषारभाऊ हिंगे यांनी नेहमीच पदांपेक्षा पक्षाची एकजूट, संघटन आणि शिस्त महत्त्वाची मानली आहे.
उपमहापौर पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सर्वांना संधी मिळावी, या उद्देशाने पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अलीकडेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या धामधुमीत पक्षात तडजोडीची गरज निर्माण झाली असताना, तुषारभाऊ हिंगे यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत भारतीय जनता पार्टीसाठी आपल्या युवा मोर्चा शहराध्यक्ष पदाचा त्याग केला.
या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे पिंपरी–चिंचवड शहर उपाध्यक्ष अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की,
“पिंपरी–चिंचवड शहरातील युवकांना तुषारभाऊ हिंगे हेच महापौर हवेत. पक्षासाठी सातत्याने त्याग करणाऱ्या, निष्ठावान आणि संघटन मजबूत करणाऱ्या नेतृत्वाची आज शहराला गरज आहे. तुषारभाऊ हिंगे यांनी प्रत्येक वेळी स्वतःला बाजूला ठेवून पक्षाला प्राधान्य दिले आहे.”
पिंपरी–चिंचवड शहरात तुषार हिंगे यांच्यासारखा सातत्याने त्याग करणारा नेता दुर्मिळ असून, असा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना युवकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा भारतीय जनता पार्टीने तुषार हिंगे यांच्या निष्ठेची, त्यागाची आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना पिंपरीचा महापौर करावे, हीच अपेक्षा भाजप युवा मोर्चासह शहरातील युवकांनी व्यक्त केली आहे.
महापौरपदासाठी विविध नावे चर्चेत असली, तरी पक्षासाठी स्वतःची पदे सोडणाऱ्या नेत्याला संधी द्यावी, असा आग्रह आता पिंपरी–चिंचवड भाजपमध्ये अधिक ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.

















