पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या राजकीय दादागिरीचा भाजपने जोरदार समाचार घेतला आहे. चार वर्षांपासून बंद असलेले आणि अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले काळेवाडी परिसरातील शालेय मैदान अखेर विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे.
काळेवाडी व पवनानगर परिसरातील महापालिकेच्या ताब्यातील मैदानावर काही ठरावीक व्यक्तींनी राजकीय आशीर्वादावर अतिक्रमण करून ते खासगी वापरासाठी बळकावले होते. परिणामी परिसरातील पाच प्राथमिक शाळांमधील तब्बल १८०० हून अधिक विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नव्हते. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास धोक्यात आला असतानाही संबंधित प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप नगरसेवक विनोद जयवंत नढे, नीता पाडळे आणि कोमल काळे यांनी थेट मैदानात उतरून अतिक्रमण हटवण्याची ठाम भूमिका घेतली. “हे मैदान कोणाच्या बापाचे नाही, तर विद्यार्थ्यांचे आहे,” असा स्पष्ट इशारा देत भाजपने प्रशासनाला कृतीस भाग पाडले.
अखेर दबावाखाली प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि मैदान शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. या मैदानाचा लाभ काळेवाडी कन्या प्राथमिक शाळा, काळेवाडी मुले प्राथमिक शाळा, पवनानगर प्राथमिक शाळा यासह एकूण पाच शाळांतील विद्यार्थी घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना भाजपने दिलेला हा ठोस संदेश असून, “शाळकरी मुलांच्या हक्कांवर कुणीही राजकारण करू देणार नाही,” अशी ठाम भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

















