पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली असून पत्रकारांनाही मतमोजणी कक्षात मज्जाव करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ च्या मतमोजणीवेळी आधीच नियोजनाचा गोंधळ असताना, माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त केला जात आहे.लोकशाही प्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मतमोजणीसारख्या पारदर्शकतेची गरज असलेल्या टप्प्यावर पत्रकारांना दूर ठेवणे म्हणजे माहिती दडपण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार संघटनांकडून उमटत आहे. विशेष म्हणजे पोस्टल मतदानाची मोजणी सुरू असतानाही मीडिया कक्षातील डिस्प्ले बंद असल्याने पत्रकारांना अधिकृत आकडे व घडामोडी मिळू शकल्या नाहीत.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रतिनिधी, उमेदवारांचे समर्थक आणि आता पत्रकारही त्रस्त झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे.
मतमोजणी प्रक्रियेत तातडीने शिस्त व पारदर्शकता आणावी, तसेच पत्रकारांना योग्य माहिती व प्रवेश द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
याबाबत निवडणूक अधिकारी राजाराम सरगर यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

















