पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद नढे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ठरलेल्या वेळेत ते मतदान केंद्रावर उपस्थित राहून शांततापूर्ण वातावरणात त्यांनी मतदान केले.
मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना विनोद नढे म्हणाले की, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा केवळ हक्क नसून तो आपला लोकशाहीतील कर्तव्य आहे. प्रभाग २२ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर येऊन निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्येही मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत आहे.
विकास, पारदर्शक कारभार आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असलेल्या विनोद नढे यांच्या मतदानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी आदर्श नागरिकत्वाचे उदाहरण घालून दिल्याची चर्चा प्रभागात होत आहे.

















