पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रचाराच्या सांगता दिवशी ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी जिजाऊ उद्यानात भव्य प्रचार सभेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली. सकाळपासूनच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांची मोठी गर्दी जिजाऊ उद्यानात जमली होती. “जनतेचा विश्वास, न्यायपूर्ण नेतृत्व आणि विकासाचा ध्यास” या भूमिकेवर शेडगे यांनी प्रचाराची सांगता करत मतदारांना थेट साद घातली.
या वेळी बोलताना ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपल्या प्रचारकाळातील अनुभव मांडत, प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, कायदा-सुव्यवस्था आणि पारदर्शक कारभार यावर ठाम भूमिका घेतली. नागरिकांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा देण्याचा अनुभव राजकारणात उपयोगात आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिजाऊ उद्यानातील या सभेला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक-युवती, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही उत्साह कमी न होता उलट कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास दिसून येत होता. घोषणाबाजी, फलक आणि झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेडगे म्हणाले, “ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर प्रभागाच्या भविष्यासाठी आहे. जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन न्याय, स्वाभिमान आणि विकासाच्या मार्गावर आपण सर्वांनी एकत्र चालले पाहिजे.”
राजकीय वर्तुळात या प्रचारसभेकडे शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिजाऊ उद्यानातून दिलेला संदेश मतदारांवर प्रभाव टाकणारा ठरल्याची चर्चा आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवशी जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याकडे लागले आहे.

