पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शहरातील हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्लू लाईनचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेतल्याने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. या यशामागे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा डोके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची निर्णायक भूमिका ठरली आहे.
ब्लू लाईनमुळे शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प, गृहसंकुले आणि व्यावसायिक इमारती वर्षानुवर्षे अडकून पडल्या होत्या. नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते, तर विकासावर गंभीर निर्बंध आले होते. या सर्व समस्यांकडे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा डोके यांनी एकत्रितपणे शासनाचे लक्ष वेधत सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून UDCPR (Unified Development Control and Promotion Regulations) मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ब्लू लाईनमुळे बाधित नागरिकांना लवकरच TDR (Transferable Development Rights) चा थेट लाभ मिळणार असून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
या निर्णयामुळे केवळ पुनर्विकासालाच चालना मिळणार नाही, तर शहराच्या नियोजित विकासाला नवी दिशा मिळेल, रोजगारनिर्मितीला हातभार लागेल आणि अडकलेली गुंतवणूक पुन्हा कार्यान्वित होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, या महत्त्वपूर्ण यशासाठी सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा डोके यांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
ब्लू लाईनचा अडसर दूर झाल्याने आता विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच त्याचे प्रत्यक्ष फायदे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

