पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ मधील म्हेत्रे वस्ती, अल्पाइन सोसायटी आणि सेलेस्टा सोसायटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नारायण बहिरवाडे यांनी थेट संवाद दौर्यातून प्रचाराला धार दिली आहे. हातात प्रचार साहित्य घेऊन नागरिकांच्या दारात पोहोचत त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या, अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या.
या संवाद दौर्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. “फक्त निवडणुकीपुरते नव्हे तर कायम लोकांमध्ये राहणारे नेतृत्व हवे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी थेट प्रश्न मांडले असता, त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन नारायण बहिरवाडे यांनी दिले.
कागदी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे उमेदवार म्हणून बहिरवाडे यांची ओळख या प्रचार दौर्यातून अधिक ठळक झाली आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा आवाज सभागृहात ठामपणे मांडणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
या घरोघरी प्रचारामुळे प्रभाग ११मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, नारायण बहिरवाडे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता निवडणुकीच्या रणांगणात ते निर्णायक ठरणार, अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

