ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिक्षण
भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय – पांडूरंग चाटे


एमआयटी एडीटी’ विद्यापीठात विश्वनाथ स्पोर्ट मिट-२०२४ स्पर्धेला प्रारंभ
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असताना ऑलिंपिकमधील पदकांची संख्या नक्कीच खटकणारी आहे. त्याचमुळे भारतातील क्रीडा संस्कृतीला सरकारच्या खेलो इंडिया, फिट इंडिया, टाॅप्स(टार्गेट ऑलिंपिक पाॅडियम) सारख्या महत्वाकांक्षी योजनांतून चालना देण्यात येत आहे. २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी सरकार प्रयत्नशिल असून त्यामाध्यमातून भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय आहे,” असे मत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे(साई) प्रादेशिक संचालक पांडूरंग चाटे(आयआरएस) यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजीत विश्वनाथ स्पोर्ट मिट(व्हीएसएम-२०२४) या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्थरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्कायडायव्हर शितल महाजन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ. मंगेश तु. कराड, डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरु डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपची अवार्डी प्रा.पद्माकर फड, ऑलिंपियन बाॅक्सर मनोज पिंगळे उपस्थित होते. चाटे पुढे बोलताना म्हणाले, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा गोल्डन काळ चालू आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे दाटवून सांगायचे, मात्र आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास सांगितले जाते. अशात एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुकही चाटे यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांनी देखील या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने हजेरी लावताना, एमआयटी एडीटी विद्यापीठ व आयोजकांचे कौतुक केले. या राज्यस्थरीय स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील जे महाराष्ट्रासोबत देशाचेही नाव मोठे करतील असा विश्वास मंत्री बनसोडेंनी यावेळी व्यक्त केला. पद्मश्री शितल महाजन यावेळी म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य दाखवायला हवे व त्यात चांगले करिअर करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून व्हायला हवा. तसेच त्यांनी एअरो स्पोर्टस(स्कायडायव्हींग) सारख्या साहसी खेळांकडे देखील वळावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.प्रा.डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, भारतातील क्रीडा संस्कृतीत वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे ऑलिंपिक-राष्ट्रकुल- आशियाई सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व वाढावे व एकंदर ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना प्रतिभा दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून आहे. त्याच उद्देशाने विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेट तर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देवून सुरुवात करण्यात आलेल्या या कार्याक्रमाचा समारोप फुटबाॅल स्पर्धेच्या उद्घाटन द्वारे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन डॉ.सुराज भोयार यांनी केले तर आभार प्रा.पद्माकर फड यांनी मानले.








