पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. ३०) प्रभाग क्रमांक २७, रहाटणीतील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही बलाढ्य पक्षांनी आपापले पॅनल जाहीर करत थेट शक्तिप्रदर्शन केले आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, प्रभागात ‘करो वा मरो’ची लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा कोणतीही संघटनात्मक ढिलाई न ठेवता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता थोपटे यांच्यासह सागर कोकणे, अश्विनी तापकीर आणि सुमित डोळस यांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीने अनुभवी नेतृत्व, तरुण ताकद आणि स्थानिक प्रश्नांवर थेट हल्लाबोल करण्याची रणनीती आखली आहे. “लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि सत्तेसाठी निर्णायक लढा” या भूमिकेतून राष्ट्रवादी प्रचाराला धार देताना दिसत आहे.
दुसरीकडे, भाजपनेही प्रभाग २७ सोडण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे आणि अर्चना तापकीर यांचा पॅनल जाहीर करत भाजपने विकासकामांचा लेखाजोखा, रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या मुद्द्यावर थेट मतदारांकडे जाण्याची तयारी केली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचा संपूर्ण पॅनल विजयी झाल्याचा आत्मविश्वास भाजपच्या प्रचारात ठळकपणे जाणवतो.
मात्र यंदा चित्र वेगळे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. स्थानिक प्रश्न, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी ही निवडणूक दिशा बदलू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील ही लढत केवळ पक्षीय प्रतिष्ठेची न राहता ‘विश्वास आणि कामगिरी’ची कसोटी ठरणार आहे.
दोन्ही बाजूंचे पॅनल तोडीस तोड, प्रचाराला मिळणारी धार आणि वाढता राजकीय तापमान पाहता प्रभाग २७ रहाटणीमध्ये अटीतटीची, तुफान आणि निर्णायक लढत होणार हे निश्चित झाले आहे. आता अंतिम निकालात मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

