प्रभाग २८ मध्ये परिवर्तनाची लाट; पिंपळे सौदागरचा प्रचार शुभारंभ ठरला टर्निंग पॉईंट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २८ मधील उमेदवारांनी पिंपळे सौदागर परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजकीय वातावरण ढवळून काढले. आज पार पडलेला भव्य प्रचार शुभारंभ हा केवळ कार्यक्रम न राहता, जनतेच्या विश्वासावर उभा असलेला विजयाचा एल्गार ठरला.
मुंजोबा चौक ते रहाटणी चौक दरम्यान निघालेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, महिलांचा उस्फूर्त सहभाग, युवकांचा जोश आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद — या सर्वांनी प्रचाराला अभूतपूर्व उर्जा दिली. विविध चौक, मंदिरे आणि मार्गांवर मिळालेल्या शुभेच्छा व आशीर्वादांनी या प्रचार शुभारंभाला लोकमान्यतेची ठोस मोहोर उमटवली.
लोकहित, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा निर्धार यावेळी ठामपणे मांडण्यात आला. “शब्द नव्हे तर काम बोलणार” या भूमिकेतून प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि पारदर्शक प्रशासनासाठी लढण्याचा स्पष्ट इशारा विरोधकांना देण्यात आला. हा प्रचार म्हणजे केवळ मतांसाठीचा प्रयत्न नसून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीची ठोस लढाई असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. “आपला विश्वास, आपला पाठिंबा आणि आपले आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत विकासाच्या या प्रवासात नागरिकांनी कायम सोबत राहावे, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.
एकूणच, पिंपळे सौदागर येथील हा प्रचार शुभारंभ म्हणजे प्रभाग २८ मध्ये सत्ताबदलाची नांदी असून, आगामी निवडणुकीत या उमेदवारांनी विजयासाठी मजबूत दावा ठोकल्याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून मिळाले आहेत.




















