पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचाराची रणनीती राबवत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत तसेच चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उमेदवार विनोद नढे यांनी प्रचारात जोमाने आघाडी घेतली आहे.
विनोद नढे यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ राजकीय घडामोड नसून, तो भाजपच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनसेवकांचा व सर्वसामान्य नागरिकांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरत आहे. प्रभागात कोपरा सभा, घराघरांत जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी आणि थेट संवाद यावर विशेष भर देत नढे यांनी प्रचाराला लोकाभिमुख व धारदार स्वरूप दिले आहे.
कोपरा सभांमधून नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडत, त्यांच्या अपेक्षा समजून घेत विनोद नढे यांनी विकासाची स्पष्ट दिशा मांडली आहे. भविष्यातील नियोजन, शाश्वत विकास, नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे, स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण व्यवस्था बळकट करणे, हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. या विकासदृष्टीला प्रभागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज सायंकाळी प्रभाग क्रमांक २२ मधील नढेनगर परिसरात पंचनाथ चौक, नंदादीप कॉलनी १ व २ तसेच पाटील हॉस्पिटल परिसरात जल्लोषात प्रचार करण्यात आला. फटाके वाजवून कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त घोषणांतून भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने परिसर दणाणून गेला. या प्रचार दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विनोद नढे यांना पाठिंबा दर्शवला.
एकूणच, प्रभाग २२ मध्ये भाजपचा प्रचार दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असून, विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली ‘विकास, विश्वास आणि विजय’ या त्रिसूत्रीवर भाजपने निवडणूक मैदानात जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

