पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असतानाच भारतीय जनता पक्षासमोर अंतर्गत नाराजीचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे विविध पक्षांतील नेत्यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश सुरू असताना, दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवारीच्या प्रश्नावर कमालीचे अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. याच नाराजीचा उद्रेक शनिवारी (ता. २०) निगडीतील भक्ती-शक्ती चौकात झालेल्या आत्मक्लेश आंदोलनातून पाहायला मिळाला.
या आंदोलनात भाजपचे माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह विजय सिनकर, समीर जावळकर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इमानदार यांसारखे ज्येष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘आयात नेत्यांना प्राधान्य नको, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्या’, अशा ठाम घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर टीका टाळली असली, तरी बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याच्या धोरणाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली.
अलीकडेच माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निगडी-आकुर्डी परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली. अनेक वर्षे पक्ष संघटना वाढवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांना तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
“पक्ष वाढवण्यासाठी घाम गाळणाऱ्यांना बाजूला सारून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली गेली, तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका एका संतप्त कार्यकर्त्याने आंदोलनस्थळी मांडली. पक्षश्रेष्ठींनी निष्ठा आणि परिश्रमाचे मोल न दिल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने पक्षाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याची कबुली दिली असून, सत्तेतील खात्रीशीर स्थानामुळे भाजप ‘सेफ झोन’ ठरत असल्याने अनेक नेते पक्षप्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या या एल्गारामुळे भाजप नेतृत्वासमोर उमेदवारी वाटप करताना समतोल साधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठी कोणती दिशा ठरवतात, याकडे पिंपरी-चिंचवडचे राजकीय लक्ष लागले आहे.

















