पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून घेतल्यानंतर, याला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय जनता पक्षाने मुंबईत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात राष्ट्रवादी, उबाठा गट व इतर पक्षांतील तब्बल २२ दिग्गज नेत्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे ही निवडणूक थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगणार आहे.
मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष उषाताई वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “सर्व पिंपरी-चिंचवडकर मान्यवरांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत आहे. देव-देश-धर्म आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून ‘विकासाभिमुख हिंदुत्वा’च्या विचारावर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप निर्विवाद विजय मिळवेल.”
आमदार शंकर जगताप यांनीही विश्वास व्यक्त करत, “मुंबईत आज राष्ट्रवादी व इतर पक्षांतून भाजपात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले असून, येत्या महापालिकेत सत्ता भाजपाचीच येणार आहे,” असे ठामपणे सांगितले.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, “महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला आहे. हा जनविश्वासाचा कौल भाजपाच्या बाजूने आहे.”
एकूणच, बारामतीतील पक्षप्रवेशाला मुंबईतून दिलेले हे प्रत्युत्तर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाची बाजू अधिक भक्कम करणारे ठरत असून, आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

















