पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी आरक्षित भूखंडावर झालेल्या धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गिरीश गोपाळ कुटे यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दळवी यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ठाकरे शिवसेना चषक हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाकडून आकुर्डीतील विठ्ठलवाडी परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी तळ हा आरक्षित भूखंड १० ते १५ डिसेंबरदरम्यान — म्हणजे पाच दिवसांसाठी — अधिकृतपणे भाडेतत्त्वावर घेतला होता. भाडे रक्कम 13,080 रुपये मनपाला भरल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मंगळवार, ९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता मंडप उभारणीसाठी दळवी आपल्या सहकाऱ्यांसह जागेवर गेले असता, गिरीश गोपाळ कुटे यांनी अचानक येत दादागिरी करत शिवीगाळ केल्याचे, तसेच तीन वेळा धक्काबुक्की करत “इथं कार्यक्रम करू देणार नाही, जागा आमची आहे” असे धमकीचे सूर लावल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
दळवी यांनी सांगितले की, मी जागा मनपाकडून घेतली असल्याचे सांगितले असता कुटे यांनी “तुला कोणाला सांगायचं ते सांग… इथून निघ नाहीतर मारून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर दळवी यांनी तातडीने 112 वर संपर्क साधून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन विचारपूस केल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यास सांगितले.
“माझ्या जीवाला धोका आहे. भविष्यात काही अनर्थ झाल्यास त्यास गिरीश गोपाळ कुटे जबाबदार असतील,” असे दळवी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

