पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील रेस्टॉरंटला भीषण आग
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील ‘हॉटेल रंगला पंजाब’ च्या खालच्या मजल्यावर सोमवारी अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचा धूर वरच्या मजल्यावरील कोचिंग क्लासपर्यंत पोहोचताच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना भाजपचे युवा नेते संदीप काटे यांनी कार्यकर्त्यांसह तातडीने धाव घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळाल्यावर काटे यांनी रहाटणी अग्निशामक विभागाशी तत्काळ संपर्क साधून टीमला घटनास्थळी पाठवले. स्थानिक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. अल्पावधीतच अग्निशामक दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे समोर आले आहे. इमारतीतील केबल्स जुन्या झाल्याने अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“वेळीच मदत पोहोचली नसती तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. इमारतीतील जुन्या वायरिंगमुळे धोका वाढतो. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.”
– संदीप काटे, भाजपा युवा नेतृत्व

