पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप–राष्ट्रवादी युतीचे गणित पुन्हा चर्चेत आले आहे. या संवेदनशील राजकीय प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका मांडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. चिंचवडमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी युतीच्या चर्चांना योग्य तो प्रतिसाद दिला. मेळाव्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत भाजपने निवडणूक तयारीची गती वाढवली.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, मावळमधील कार्यकर्त्यांसोबत नियोजित बैठकीला जात असताना त्यांनी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यालाही उपस्थिती दर्शवली. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत निर्णय प्रक्रिया पूर्णपणे स्थानिक पदाधिकारी आणि कोअर कमिटीच्या शिफारशींवर आधारित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्या-त्या ठिकाणचे प्रस्ताव वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आगामी निवडणूक मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच राबविली जाणार असून, भाजप पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरण्यास सज्ज आहे.

















