पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ताथवडे-पुनावळे परिसर पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने रंगणार आहे! ताथवडे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीग २०२५ (TPL 2025) या बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धेला रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तब्बल ८२ संघांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, यापैकी १२ महिला संघ आणि ७० पुरुष संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचं आयोजन चेतन अण्णा पवार स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे करण्यात आलं असून, नोंदणी प्रक्रिया १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पार पडली. स्पर्धेची सुरुवात २३ नोव्हेंबरपासून होणार असून, सामने पुढील तीन विकेंड्सदरम्यान सुखवाणी पाम्स टर्फ अँड स्पोर्ट्स, ताथवडे येथे रंगणार आहेत.
स्पर्धेच्या जल्लोषात भर घालण्यासाठी भव्य जर्सी आणि शर्ट अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आमदार सचिन भाऊ आहेर, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख शिवसेना (ठाकरे गट) संजोग वाघेरे पाटील, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विट्ठल नाना काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही तरतूद करण्यात आली आहे. पुरुष गटात पहिलं बक्षीस ₹९९,९९९/-, दुसरं ₹७७,७७७/-, तिसरं ₹५५,५५५/-, तर महिला गटासाठी पहिलं ₹५५,५५५/-, दुसरं ₹३३,३३३/-, आणि तिसरं ₹२२,२२२/- ठरवण्यात आलं आहे.
तसंच सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना ₹५,५५५/- चे बक्षीस देण्यात येईल, तर Player of the Tournament म्हणून निवडल्या जाणाऱ्या खेळाडूला ₹७,७७७/- चे पारितोषिक मिळणार आहे.
ही स्पर्धा फक्त ताथवडे-पुनावळे परिसरातील नोंदणीकृत सोसायट्यांसाठी खुली असून नोंदणी पूर्णतः मोफत आहे. स्थानिक पातळीवर क्रीडासंवर्धन, सामाजिक एकजूट आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

