पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कैलास बारणे यांचा मदतीचा हात — छावा मराठा युवा महासंघाकडे शैक्षणिक साहित्य सुपूर्त

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाड्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक भावनेतून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक व माजी गटनेते कैलासबाबा बारणे यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत कैलास बारणे यांनी शालेय पिशव्या, वही, पेन, पेन्सिल, शालेय साहित्य संच अशा आवश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर छावा मराठा युवा महासंघाकडे सुपूर्त केला. महासंघाच्या माध्यमातून हे साहित्य मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवण्यात येणार आहे.
या उपक्रमावेळी छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, तसेच प्रविण बारणे, अक्षय बारणे, योगेश मोरे, अविनाश सुतार, निलेश भिसे, मारुती मोहिते, वरध बारणे, श्रीवेध बारणे, ओवी बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक नागरिक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कैलास बारणे यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मिळालेली ही मदत म्हणजे फक्त साहित्य नाही, तर शिक्षणाबाबत नव्याने उभारी घेण्यासाठी प्रेरणादायी संदेश आहे.”
कैलास बारणे यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाने संकटाच्या काळात आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा, हेच आपले सामाजिक कर्तव्य आहे. शिक्षण थांबता कामा नये — हीच या उपक्रमामागची भावना आहे.”













