ताज्या घडामोडीपिंपरी
सोलापूरमधील पूरग्रस्तांसाठी वाल्हेकरवाडीकरांचा ‘एक हात मदतीचा’! – बिभीषण चौधरी यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तांदुळवाडी व उंदरगाव या गावांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सीना नदीच्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सोलापूरकरांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. एक हात मदतीचा या आवाहनाला प्रतिसाद देत माजी स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात आले. यामध्ये अन्यधान्य, कपडे, साड्या, औषधे, ब्रश, तेल, साबण यासह विविध वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री तांदुळवाडी आणि उंदरगाव या पूरग्रस्त गावांमध्ये रवाना करण्यात आली.
या उपक्रमात उमेश गायकवाड, मनोज तोरडमल, आदेश नवले, अनिकेत क्षिरसागर, मोहन राऊत, सौ. शिल्पाताई राऊत, दिलीप गडदे, दत्ताभाऊ ढगे, शिरीष कर्णिक, हनुमंत सकुंडे, प्रकाश आखाडे, महेश बारसावडे, नंदकुमार गौरे, राज बिराजदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महिला बचत गटांनी विशेष मेहनत घेऊन मदत किट तयार केले, तर जनहित फाऊंडेशन आणि शिवशंभो विचार मंच, शाहूनगर यांच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहभाग नोंदवला. अनेक नागरिकांनीही सामाजिक जाणिवेतून या कार्यात हातभार लावला.
हा उपक्रम पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. संकटकाळात समाजाने एकजुटीने केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बिभीषण चौधरी आणि टाटा मोटर्स ए. युनियनचे प्रतिनिधी उमेश गायकवाड यांनी सर्व सहभागी नागरिक, कार्यकर्ते आणि संस्थांचे मनापासून आभार मानले.
बिभीषण चौधरी यांनी सांगितले की, वाल्हेकरवाडीकरांनी दाखवलेला हा सेवाभाव समाजातील एकता आणि माणुसकीचे प्रतीक आहे. पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढील टप्प्यातही अशा उपक्रमांना गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.













