पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाकडून पुरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” – युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांचा पुढाकार
- युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांचा पुढाकार; 500 किटचे वाटप करणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या महिन्याभरात मराठवाडा भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. हातातोंडाला आलेले शेतातील उभे पीक पावसाने वाहून नेले. शेती अक्षरशः खरवडून निघाली. बळीराजाच्या या संकटात पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चा नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या सोबत असून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा दिला आहे. पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्त नागरिकांसाठी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव व युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 500 मदत किट तयार करून पूरपरिस्थितीत अडकलेल्या बांधवांसाठी पाठविण्यात येणार आहेत.
या मदत किटमध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, स्वच्छतेसाठी साहित्य आणि काही वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती यादव यांनी दिली.
“संकटाच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आम्ही फक्त एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे,”
दिनेश यादव
अध्यक्ष, युवा मोर्चा- पिंपरी चिंचवड शहर













