ताज्या घडामोडीपिंपरी

वास्तुकलेची व्याप्ती खूप मोठी – किरण कलामदानी

एस. बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वास्तुकला हा एक विशाल व्यवसाय आहे. याची व्यापकता खूप मोठी असून यामध्ये अनेक संधी आहेत. कामाचे चक्र समजून घेणे आणि केवळ पैसेच नव्हे तर सद्भावना आणि मिळालेला आदर जीवनाला परिपूर्ण बनवतो, असे मत प्रसिद्ध वास्तुविशारद आणि संवर्धन तज्ज्ञ किरण कलामदानी यांनी व्यक्त केले.
     पिंपरी चिचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन (एसबीपीसीओएडी) येथे आर्किटेक्चरच्या २०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी एसबीपीसीओएडीच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी उपस्थित होत्या.
    किरण कलामदानी यांनी पालकांसोबत संवादातून आणि प्रश्नोत्तरांव्दारे आर्किटेक्चर मधील करिअरबद्दलच्या शंकांचे निरसन केले. पेन्सिल असो किंवा संगणक, ते फक्त तुमचे विचार व्यक्त करण्याचे एक साधन आहे. तुमच्या कल्पनेतून तुम्ही निर्माण केलेले जग खरोखर महत्त्वाचे आहे. ‘डिझाईन द माइंड’ हे पुस्तक विद्यार्थ्यांनी जरूर वाचावे. यामध्ये आघाडीच्या वास्तुविशारदांच्या मुलाखती असून पुस्तक डिझाइनमागील विचार प्रक्रिया व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, यावर भर देते, असे कलामदानी यांनी सांगितले.
     विद्यार्थ्यांना वास्तविक जगाचा अनुभव मिळविण्यासाठी वास्तुविशारदांसोबत अर्धवेळ काम करा. सुरुवातीची वर्षे विशेषीकरणाशिवाय कठीण असू शकतात. पण विद्यार्थ्यांनी मिळवलेले व्यावहारिक कौशल्य अमूल्य आहे. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून आणि वास्तुकले मधील कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याबद्दल स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचा सल्ला कलामदानी यांनी दिला.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button