पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भक्ती शक्ती चौकात २५ सप्टेंबरला स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या ‘एक दिवस – एक तास – एक साथ’ या उपक्रमांतर्गत निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये परिसरात स्वच्छता करण्यासोबतच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी,माजी नगरसदस्य,नगरसदस्य,महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचतगट सहभागी होणार आहे.
आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘आपला परिसर, आपली जबाबदारी’ हा संदेश देत प्रत्येकाने समाजहितासाठी एक तास श्रमदान करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.













