ताज्या घडामोडीपिंपरी
“पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांचा आवाज उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर; औद्योगिक पार्कसाठी ठाम मागणी”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांनी विविध शासकीय विभागांकडून उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी मा. उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये आले असता, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने हे निवेदन त्यांना देण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, भारत नरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना एकत्रित बैठक घेण्याचे निर्देश दिले.
लघुउद्योजकांनी मांडलेल्या प्रमुख समस्यांमध्ये चिखली व कुदळवाडी परिसरातील स्वतःच्या मालकीच्या जागांवर सुरू असलेल्या उद्योगांवरील महापालिकेच्या अनियमित कारवाईमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. काहीजण देशोधडीला लागले असून अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत.
उद्योजक मागणी करत आहेत की:
चिखली व कुदळवाडी परिसरातील जागा औद्योगिक पार्क म्हणून विकसित कराव्यात.
महानगरपालिकेने ७/१२ उताऱ्यावर आधारित औद्योगिक झोन तयार करून तेथे आवश्यक पायाभूत सुविधा पुरवाव्यात (जसे की सीईपीटी, एसटीपी, रस्ते, ड्रेनेज, वीज व्यवस्था, पथदिवे इ.).
निष्कासन कारवाईनंतर जमीन मोजणी आणि विकासाच्या संदर्भात अर्ज नाकारले जात आहेत. महानगरपालिका व भूमी अभिलेख विभागातील समन्वयाचा अभाव दूर करून जागा विकासाला मदत करावी.
लघुउद्योजकांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात यावे व भरपाई द्यावी.
महानगरपालिका, औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, पोलिस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पीएमआरडीए यांच्यासोबत लघुउद्योजकांचे विविध मुद्दे प्रलंबित आहेत. त्यामुळे या सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.













