ताज्या घडामोडीपिंपरी
कचऱ्यापासून खतनिर्मितीचा आदर्श उभारणारा दापोडी शून्य कचरा प्रकल्प!
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला दापोडी शून्य कचरा प्रकल्प हा केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून महिलांचे सबलीकरण, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम ठरत आहे. या प्रकल्पासाठी दररोज कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा प्रकल्प महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. घरगुती कचऱ्याचे संकलन केल्यानंतर तो वर्गीकृत करून त्याद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी येथे व्यवस्थित घेतली जात आहे. या महिलांना आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
चारशेपेक्षा जास्त घरांतील कचऱ्याचे केले जाते संकलन
दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवला जातो. प्रकल्पासाठी दररोज ४२८ घरांतील कचऱ्याचे संकलन केले जाते. त्यानंतर या कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येते. या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी त्यावर धूळ झटकण्याची मशीन, ॲग्लोमीटर मशीन, हायड्रॉलिक प्रेस मशीन, सेमी ऑटोमॅटिक खत मशीन आदीच्या मदतीने प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रियेनंतर तयार होणारे सेंद्रिय खत शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे.
ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
• ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण व पुनर्वापर प्रक्रिया
• कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी अत्याधुनिक साधनसामग्रीचा करण्यात येतो वापर
• कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना
• संपूर्ण प्रकल्प महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवला जातो.
• महिलांना रोजगार, आत्मविश्वास आणि समाजात नवी ओळख मिळवून देण्यासाठी उपयुक्त प्रकल्प.
दापोडी शून्य कचरा प्रकल्प हा केवळ कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सबलीकरणाचा व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उत्तम नमुना आहे. महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळत असून शहरातील कचरा व्यवस्थापनाची एक नवी दिशा निर्माण झाली आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
दापोडी शून्य कचरा प्रकल्पामध्ये आम्ही केवळ कचरा संकलनापुरते मर्यादित न राहता त्याच्या शास्त्रशुद्ध प्रक्रियेसह उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. महिलांच्या माध्यमातून चालणारा हा उपक्रम भविष्यातील शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी एक मॉडेल ठरेल.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका













